पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्‍टोबरला पुण्यात सभा

पुणे – पुणे जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्‍टोबरला दुपारी 4 वाजता एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. पावसाची स्थिती पाहून सभेसाठी मंडप उभारण्यात आला आहे.

यावेळी महायुतीचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतील उमेदवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार गिरीश बापट आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, प्रवक्‍ते उज्ज्वल केसकर उपस्थित होते.

ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आले त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत कलम 370 सह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, याचा लाभ निश्‍चित महायुतीच्या उमेदवारांना होईल, असे बापट म्हणाले. पुण्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाचा सक्षम उमेदवारच नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर काही ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत. त्यांना मनसेच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा लागतो, यावरून सर्वकाही स्पष्ट होते, अशी टीकाही बापट यांनी केली.

पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी मिसाळ यांनी माहिती दिली. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम जिल्हा आणि शहरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.