पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगावात कलम 370, तिहेरी तलाखवरच भर

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जळगावात आपल्या पहिल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370, तिहेरी तलाक आदी विषयांवरच भर दिला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. त्यामुळे उपस्थितांमधून एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र महाजनादेशासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही पण देणार ना महाजनादेश, असा सवाल त्यांनी उपस्थितांना मराठीत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘5 ऑगस्टला भारताने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याआधी हा निर्णय घेण्याचे धाडस होत नव्हते. जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला वंचित ठेवले जात होते. त्या परिस्थितीत फक्त स्वतंत्रतावाद आणि दहशतवादाचा विस्तार होत होता. जम्मू-काश्‍मीर आणि लडाख केवळ जमिनीचा तुकडा नाही. तर, भारताच मस्तक आहे. त्या जमिनीतील कण-कण भारताला मजबूत करते. जम्मू-काश्‍मीरमध्ये 40 वर्षे जी आसामन्या परिस्थिती होती ती सामान्य होण्याला चार महिनेही लागले नाहीत.’

नव्या भारताचा नवा जोश जगाला दाखवायचा आहे. जगभरात भारताचा डंका वाजण्यामागे 130 कोटी देशवासियांचे हात आहेत. भारताचा आवाज जगभरात ताकदीने ऐकला जात आहे. प्रत्येक देश भारताच्या साथीने उभा आहे. आपल्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्यासाठी उत्साही आहे. असंही मोदी म्हणाले. विरोधक उलटसूलट चर्चा करून लोकांना केवळ मूर्ख बनवू पाहत आहेत. विरोधकांनी अनुच्छेद 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न केला तर देशातली जनता त्यांना तसं करू देईल का? या देशात विरोधकांचे राजकीय भवितव्य उरेल का?, असा सवाल मोदींनी विचारला. याशिवाय, आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. आता जनतेने पुन्हा सत्ता दिल्यास भाजप उर्वरित कामेही पूर्ण करेल, असे मोदींनी सांगितले. दरम्यान, आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षातील कॉंग्रेसे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.