नवी दिल्ली : देशात आज हनुमान जयंतीचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. दोन वर्षाच्या करोना काळानंतर आज निर्बंधा विना जयंती साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे आज अनावरण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पवनपुत्राचे आशीर्वाद सर्वांवर असोत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी यांचे चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना बसवण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात याची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा पुतळा आहे. या मालिकेतील पहिला पुतळा 2010 मध्ये शिमल्यात बसवण्यात आला होता.
हनुमान जयंती के पावन पर्व पर आप सभी को और समस्त देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं। इस पावन अवसर पर आज मोरबी में हनुमान जी की इस भव्य मूर्ति का लोकार्पण हुआ है। देश और दुनिया भर के हनुमान भक्तों और रामभक्तों के लिए बहुत सुखदायी है, आप सभी को बहुत-बहुत बधाई: प्रधानमंत्री https://t.co/AtygbijqmL pic.twitter.com/N1yQTY8Dpy
— ANI_HindiNews (@AHindinews) April 16, 2022
मोरबीमध्ये 2018 मध्ये भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
याआधी देशातील विविध राज्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अलीकडच्या काळात देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आधी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली, त्यानंतर कर्नाटकात मंदिरांभोवतीचे मुस्लिम दुकानदार हटवण्याची आणि मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची प्रकरणे समोर आली.