साथी हात बढाना! पंतप्रधानांचे खेळाडूंना आवाहन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाय योजना केल्या जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नामवंत खेळाडूंशी संपर्क साधला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, विराट कोहोली, फुलराणी पी.व्ही. सिंधूसह अनेक नामवंत खेळाडूंचा त्यात समावेश होता. त्यांनी कोरोनाच्या जनजागराणात सहभागी होण्याचे आवाहन या खेळाडूंना केले.

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिज्जू यांच्यासह किमान 40 खेळाडू यात सहभागी झाले होते. सकाळ 11 वाजता सुरू झालेला हा व्हिडिओ कॉल तासभर सुरु होता. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जनजागरण करण्यात या खेळाडूंनी सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. तुमच्या सूचनांची दखल घेतली जाईल. आपण या साथीचा मुकाबला टीम इंडिया बनून करत आहोत. तुम्ही दिलेल्या प्रेरणेने देशाचा कायापालट होईल, असा मला विश्‍वास आहे, असे मोदी म्हणाले.

देशातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यात नियमितता कधी येईल, याचा अंदाज कोणीही व्यक्त करू शकत नाही. बराच काळ प्रतिक्षेत असणारी प्रिमियर लिग स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली आहे. तेंडूलकर, गांगुली आणि कोहली या दिग्गजांसह रोहीत शर्मा, झहीर खान, युवराज सिंहही सहभागी झाले होते. मात्र धोनी आणि केएल राहूल यांची नावेही या यादीत होती मात्र ते दोघे सहभागी होऊ शकले नाहीत.

बॅडमिंटनची ऑलिम्पिक रजत पदक विजेती सिंधूसह भालाफेकपटू नीरज चोप्रा, बुध्दीबळपटू विश्‍वनाथ आनंद, धावपटू हिमा दास, बॉक्‍सिंगच्या मैदानची सम्राज्ञी एम. सी. मेरी कोम आणि अमित पंघाळ, कुस्तीपटू विनेश फोगाट, नेमबाजीतील उगवता तारा मनु भाकर यांचा त्यात समावेश होता. यातील 12 जणांना प्रत्येकी तनि मिनिटे देण्यात आली होती. त्यात तेंडूलकर, गांगुली, मेरी कोम आणि कोहली यांनी संवाद साधल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.