पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला म्हणजेच येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाशी संबंधित केंद्राची योजना काय आहे यावर चर्चा करणार आहेत. या लसीकरणाच्या रोलआउट दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण तसेच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशनल क्षमतेची माहिती घेण्यासाठी नुकतेच नॅशनल ड्राय रनदेखील करण्यात आले होते.

सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबतीत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी अभियान सुरु करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, कोरोनाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणावर अभियान सुरु करण्यात येणार आहे. देशात कोरोनाच्या लसीची उपलब्धता करुन देणे हे सरकारचे मोठे यश आहे. पक्षाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत. यामध्ये पक्षाचा प्रत्येक नेता सामील होणार आहे.

29 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या दरम्यान राज्यसभा आणि लोकसभेचे पीठासन अधिकारी लसीकरणाच्या प्राथमिकतेच्या विषयावर सरकारशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी झालेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सर्व खासदार आणि आमदारांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राथमिकता द्यावी अशी मागणी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.