देहूगाव (वार्ताहर) – संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.13) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर देहूत कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. स्वच्छता व सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे. सर्व आवश्यक कामे झाल्यामुळे देहूचे रूपडे पालटले आहे. तर मोदी ज्या ठिकाणी भेट देणार आहेत, त्या ठिकाणी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देहूत येत आहेत. यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्याबरोबरच भागवत धर्माची पताका देखील फडकविणार आहेत. दुपारी हेलिकॉप्टरने आल्यानंतर झेंडे मळा येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्याकरिता तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने 14 कमानीजवळ पोहचतील. कमानीजवळून मंदिराकडे पायी पोहचतील. चारशे वारकऱ्यांसमवेत या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे बावीस एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाच्या चारही बाजूंनी पत्रे लावून बंद केला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवी कडे दोन लहान मंडप टाकण्यात
आले आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थान व नगर पंचायत यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे वॉर्निश पॉलिश काम, ओवऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. देहू नगरपंचायतीने रस्त्याची साफसफाई, विजेचे खांब व गटार दुरुस्ती केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या भरून बुलडोझर फिरवून दाबून घेण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणाहून हेलिपॅडपर्यंत डांबरी रस्ता बनविण्यात आला आहे. मंडपामध्ये 40 हजार नागरिकांची बसण्याची सोय आहे. याठिकाणी एलइडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
सभास्थानी जाण्याचा मार्ग
-आळंदी रस्ता व तळेगाव- चाकण रस्ता येथून येणाऱ्या भाविकांनी विठ्ठलवाडीपर्यंत यावे. तेथून जुन्या पालखी मार्गाचा वापर करावा.
-देहूरोड-देहू रस्त्याने सरळ सभास्थानी जाता येईल.
-सभा स्थानापासून दीड किलोमीटरवर वाहनांची पार्किंगची व्यवस्था असेल.
-देहूगावातील भाविक जुन्या पालखी मार्गाने सभास्थानी येतील.
वाहतूक व्यवस्थेतील बदल
-पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमान पासून देहू गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
-निगडीतील भक्ती शक्ती चौक- तळवडे- कॅनबे चौकापर्यंत पर्यायी रस्ता.
-तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा ते परंडवाल चौक व्हीआयपी वाहनं शिवाय इतर वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहील.
-देहू कमान ते 14 टाळकरी कमान पर्यंत रस्ता बंद राहील.
-साईराज चौक- सांगुर्डी फाटा- परंडवाल चौक- भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद.
संत तुकाराम महाराज पगडीने होणार पंतप्रधानांचा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (दि. 14) जून रोजी जगदगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहूत पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांना देहू संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराज पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून देहू संस्थानने संत तुकाराम महाराज पगडी आणि उपरणे तयार करून घेतले आहे.
या दोन्ही पगड्या वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. संत तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी तयार करण्यात आली आहे. यासाठी त्याकाळी जे कापड पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड वापरले असून, ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती घातल्यावर गंध आणि टिळा हा वेगळा लावण्याची गरज पडत नाही. संत तुकाराम महाराजांची ही पगडी पारंपरिक आहे. वारकरी सांप्रदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पगडीने देशाच्या पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार असल्याने, देहू संस्थानबरोबरच वारकरी सांप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुळशीच्या माळांची सजावट
पगडीला तुळशीच्या माळांनी सजावट केलीय. यासाठी विशिष्ट पद्धतीने याची बांधणी केली आहे. ऑफ व्हाइट रंगाची ही पगडी आहे. याच कापडाचे उपरणेही बनविण्यात आले आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंगही लिहिले आहेत. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवताना चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील. सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतिके ठेवण्यात आली आहेत.