नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक विजय मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवून दिले आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा ५-४ फरकाने पराभव केला आणि कांस्यपदक आपल्या खिशात टाकले. याच दरम्यान, संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संवाद साधला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह, मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड आणि सहाय्यक प्रशिक्षक पीयूष दुबे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे त्यांनी अभिनंदन केले.
#WATCH | PM Narendra Modi speaks to the India Hockey team Captain Manpreet Singh, coach Graham Reid and assistant coach Piyush Dubey after the team won #Bronze medal in men's hockey match against Germany#TokyoOlympics pic.twitter.com/NguuwSISsV
— ANI (@ANI) August 5, 2021
पंतप्रधान मोदींनी कर्णधार मनप्रीत सिंहला तुम्ही इतिहास रचला असे म्हणत अभिनंदन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर खेळाडू खचले होते. पण आजच्या विजयाने आत्मविश्वास वाढल्याचे आवाजातून जाणवल्याचेही मोदींनी फोनवर सांगितले.
भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ‘भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.’ भारताने एका रोमहर्षक सामन्यात जर्मनीला 5-4 ने पराभूत करून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
मोदींनी ट्विटमध्ये असे म्हटले की,’ऐतिहासिक! आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत राहील. कांस्य पदक भारतात आणणाऱ्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीने त्यांनी संपूर्ण देशाचे, विशेषता तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.’