नरेंद्र मोदींचा इतिहास कच्चा ; शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार

उस्मानाबादमधील पाण्याच्या जबाबदारीचं राणाजगजितसिंह पाटील यांना भान

उस्मानाबाद: उस्मानाबाद मतदारसंघाचे संयुक्त महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व पुरोगामी पक्षांचे नेते एकवटले होते. या सभेला संबोधित करताना उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपले कार्याची रूपरेषा स्पष्ट करताना भाजपाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या समस्या मार्गी लावणारा, केंद्राच्या योजना आणणारा नेता आपल्याला आणायचा आहे. पाच वर्षांपूर्वीचे दिवस आठवा प्रत्येक गोष्टीचे आश्वासन देण्याशिवाय या सरकारने वेगळे काहीही केले नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे तरुणांचे रोजगार सुटले अनेक संकटं ओढवली.”

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नगरविकास आणि पाटबंधारे खात्यातील कामाची आठवण काढली. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले. हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित होता. अशा डॉक्टर साहेबांकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी आली आणि आपल्या अधिकाराच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनंतर राणाजगजितसिंह पाटील यांनी ती जबाबदारी घेतली, असे म्हणत शरद पवार यांनी राणाजगजीतसिंह यांचे कौतुक केले.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व संयुक्त महाआघाडीतर्फे तरुणांना उमेदवारी देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, मी असेन अथवा शिवराज पाटील चाकुरकर असतील आम्ही देशासाठी अतोनात काम केले. आता तरुणांनी पुढे येण्याची वेळ आली आहे. यावेळी अनेक मुद्द्यांबाबत उपस्थित जनतेशी संवाद साधताना खा. शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतिहास कसा कच्चा आहे हे त्यांनी उदाहरण देऊन सांगतिले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका करायला जमतं. खरंतर मोदींना इतिहासच माहीत नाही. स्वातंत्र्य चळवळीत नेहरू नऊ वर्षे तुरुंगात होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळाला.

मोदींचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले, ७० वर्षे देशात काहीच विकास झाला नाही असे मोदी बोलत आहेत. या ७० वर्षात अटलबिहारी वाजपेयी हेही पंतप्रधान होते. मग अटलबिहारी वाजपेयी यांनीही काम केले नाही, असे मोदींना म्हणायचे आहे का? असा सवालही खा. शरद पवार यांनी विचारला.

या सभेला उमेदवार राणजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी खा. शरद पवार यांच्यासह लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे नेते बसवराज पाटील, आ. मधुकर चव्हाण, माजी मंत्री आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर तसेच महाआघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.