गुजरातच्या पश्चिम किनार्यावर तौत्के चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी गुजरातच्या वादळग्रस्त भागाचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
त्यानंतर गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
गुजरातच्या वादळग्रस्त भागाचा हवाई दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये तातडीने बैठक घेतली. या बैठकीत गुजरातमधील वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातल्या गावांना बसला आहे. चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाला, तेव्हा किनारी भागातल्या एकूण २४०० गावांमधला वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेचे हजारो खांब उन्मळून पडले आहेत.
या भागातले तब्बल १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० हजार झाडे उन्मळून पडली आहेत. तब्बल १६ हजार ५०० घरांचे नुकसान झाले असून किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.