पंतप्रधान मोदी शनिवारी पुण्यात

सिरम इन्स्टिट्यटमध्ये घेणार लस निर्मितीचा आढावा

पुणे – करोनावरील लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि.28) पुण्यात येत आहेत. यावेळी ते हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लस निर्मितीए उत्पादन कालावधी आदींचा आढावा घेणार आहेत.

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार असून तेथून हेलिकॉप्टरने ते सिरम इन्स्टिट्यूटकडे रवाना होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, शनिवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याचदिवशी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट होत आहे, असा योगायोग जुळून आला आहे.

करोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. करोना प्रतिबंधक लस कधी येणार यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे देशाचे लक्ष लागले आहे. करोना लसीच्या तयारीची माहिती पंतप्रधान मोदी घेणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून हवाई मार्गे पंतप्रधान मोदी हडपसरकडे रवाना होणार आहेत. याठिकाणी ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. त्यानंतर अडीच वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळावरून दिल्ली येथे रवाना होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.