कोल्हापूर -इंग्लंडच्या राजघराण्यातील रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची “जगदंबा तलवार’ भारतात परत आणण्यासाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेने केली. महाराजांची तलवार परत आणण्यासाठी संघटना रस्त्यांवर उतरणार असून पुण्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी व्टेंटी सामना गनिमी काव्याने उधळून लावण्याचा इशाराही दिला आहे.
आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स’ 1875 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर संस्थानांचे चौथे शिवाजी यांच्यावर दबाव आणून दिवाण बर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडच्या राजपुत्राला भेट देण्यास भाग पाडले होते. या भारत दौऱ्यात प्रिन्स ऑफ वेल्सने भारतातील अनेक राजघराण्यातील दुर्मिळ वस्तू इंग्लंडला नेले.
जगभरातील दुर्मिळ वस्तू रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये ठेवली आहेत. 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या दौऱ्यानंतर इंग्लंडमधील साऊथ केनस्टिंग गॉन म्युझियम’ चे संचालक पर्डन क्लार्क यांनी कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स अँड ऑबजेक्टस् ऑफ आर्ट’ नावाने छापला आहे.
या कॅटलॉगमध्ये इंग्लंडचा राजपुत्र भेटीला आला होता त्या शस्त्रांची छायाचित्रासह शस्त्रे आणि मौल्यवान वस्तूंची माहिती दिली आहे. त्यामध्ये करवीरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिलेल्या शिवरायांच्या जगदंबा तलवारीची छायाचित्रासह नोंद आहे.