प्रशासनाची उदासीनता : केवळ सव्वा दोन लाख रूपये खर्च
पिंपरी – गर्भवती मातांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला महापालिका प्रशासनाची उदासीनता भोवली आहे. या योजनेला महापालिका क्षेत्रात अत्यल्प प्रतिसाद लाभला असून 2017-2018 या वर्षात केवळ सव्वादोन लाख रुपये इतकी रक्कम खर्ची पडली आहे, तर यासाठी मिळालेल्या केंद्राच्या अनुदानापैकी तब्बल साडे सत्तावीस लाख रुपये शिल्लक राहिले आहेत.
“प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ ही केंद्रशासन पुरस्कृत आहे. या योजनेंतर्गत 1 जानेवारी 2017 किंवा त्यानंतर गरोदर असणाऱ्या किंवा प्रसूत झालेल्या सर्व विवाहित महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या खेपेसाठी ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील पहिल्या अपत्यापर्यंत लाभार्थी महिलेस पाच हजार रुपये इतकी रक्कम तीन टप्प्यांमध्ये लाभार्थींच्या बॅंक खाते किंवा पोस्ट कार्यालय खात्यामध्ये जमा केली जाते. लाभार्थी महिलेने गरोदरपणाची नोंद 100 दिवसांच्या आत केल्यानंतर एक हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येतो. गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी केल्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
प्रसुतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बाळाला वेगवेगळे डोस घेतल्यानंतर तिसरा व शेवटचा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थीच्या खात्यावर जमा केला जातो. या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील आणि सर्व लाभार्थ्यांना लागू राहणार असून वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या नोकरदार महिलांनाही ही योजना लागू असणार आहे. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत महापालिकेला 25 हजार 450 लाभार्थी इतके उद्दिष्ट्य दिले आहे.
उर्वरित रक्कम याच आर्थिक वर्षी वापरणे आवश्यक –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 29 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे महापालिका क्षेत्रात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. मंजूर रकमेतील केवळ 2 लाख 29 हजार 721 रुपये इतकीच रक्कम खर्ची पडली आहे. उर्वरित तब्बल 27 लाख 46 हजार 279 इतकी रक्कम शिल्लक असून हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ही शिल्लक रक्कम खर्च करणे महापालिकेसमोर आव्हान असणार आहे.