प्रधानमंत्री कुठल्या पक्षाचा नसून देशाचा असतो, मोदींचे सरकार राष्ट्रीय आपत्ती- शरद पवार

आजवर देशात विरोधकांचा सन्मान केला जात होता. मात्र सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे

नाशिक: देशात आजवर पहिलेच असे पंतप्रधान बघितले आहेत की जे विरोधी पक्षातील लोकांचा सन्मान न राखता सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना योग्य वागणूक न देता, त्यांच्यावर टीका-टिपणी करतात. आजवर देशात विरोधकांचा सन्मान केला जात होता. मात्र सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही. प्रधानमंत्री हा देशाचा असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो, मात्र सध्या देशातील मोदींचे सरकार ही राष्ट्रीय आपत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केली आहे. राज्यांच्या प्रमुखानेही विरोधकांना सन्मानाने वागवण्याची गरज आहे. मात्र ते देखील राज्यात दिसत नाही. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबात तुम्ही जामिनावर आहात अशी भाषा केली जाते, हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही असे ते पुढे म्हणाले.

छगन भुजबळ अडचणीतून बाहेर पडलेत. महाराष्ट्रात जनजागृती निर्माण करण्यासाठी ते लढत आहेत, ही गौरवाची बाब आहे, असेही पवार यांनी नमूद केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संयुक्तिक बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी शरद पवार म्हणाले की ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून येतो, त्यानंतर व्यापक दृष्टीकोनातून देशातील सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता आहे. एकदा लोकप्रतिनिधी झाल्यावर आपण पक्षाचे नव्हे तर जनतेचे प्रतिनिधित्व करत असतो, ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. लोकशाहीला संसदीय पद्धतीने दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्यामुळे आजवर लोकशाही टिकली.

जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केली त्यासाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहासच नाही तर भूगोलही बनवला. इतकी कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब जनता ही इंदिरा गांधी यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळेच त्या लोकप्रिय झाल्या. मात्र आजचे प्रधानसेवक देशात गेल्या साठ वर्षांत झाले काय, ही जी भाषा करतात, ती कुणालाही पटणारी नाही, असे सांगतानाच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्यासाठी सारखेच आहेत. त्यात कुठलाही दुजाभाव नाही, असे स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)