लहान मुलांच्या भावनिक विकासासाठी प्रयत्न
– निमिष गोखले
पुणे – महापालिकेच्या शाळांमधील मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी गेले दोन वर्ष त्या झटत आहेत. करोना लॉकडाऊनच्या काळात आपला हा ज्ञानयज्ञ सुरू राहण्यासाठी त्यांनी यू ट्यूब चॅनेलची समिधा त्यात टाकली. या अव्याहत चालणाऱ्या ज्ञानदानाच्या गंगेचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या “मन की बात’मध्ये केले. नामांकित लेखिका वैशाली व्यवहारे असे या उपक्रमशील पुणेकराचे नाव…
धकाधकीच्या आजच्या काळात मानसशास्त्राला महत्त्व आले आहे. खरं तर शाळेपासूनच तो रोचक स्वरूपात शिकवायला हवा. ही बाब लक्षात घेऊन अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्याथ्यार्थांना हा विषय स्वयंस्फुर्तीने शिकवणाऱ्या व्यवहारे यांचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये केला. व्यवहारे यांची ही संकल्पना सुपरहिट ठरल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या चळवळीला म्हणा किंवा प्रोजेक्टला म्हणा आम्ही दोन वर्षांपूर्वी सुरवात केली. अस्मी असं त्याचं नाव ठेवलं. मी लेखिका असले तरीही मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय. त्यातच माझे शिक्षण झालंय. माझ्या आईने (डॉ. कल्पना व्यवहारे) त्यांचे घर दान केले. तो पैसा डॉ. कल्पना व्यवहारे या फाउंडेशनसाठी वापरत त्यातून प्रोजेक्ट अस्मी आम्ही सुरू केला.
यात लहान मुलांच्या भावनिक व मानसिक विकासाचा उद्देश ठेवण्यात आला. यासाठी मानसशास्त्रज्ञांची टीम आम्ही तयार केली. पालिकेच्या शाळांमध्ये जाऊन, वस्त्यांमध्ये जाऊन मुलांचे मित्र बनून, त्यांना यात रुची वाटेल अशा पद्धतीने त्यांना शिकवण्याची पध्दत बनवण्यात आली. तसा अभ्यासक्रमही तयार केला, व्यवहारे आपल्या कामाची सुरवात “प्रभात’ला सांगत होत्या. दर 15 दिवसात 1 दिवस 1 तास शाळा-वस्त्यांमध्ये जाऊन हा विषय शिकवला. याकरिता व्हॉट्स ऍपने आवाहन केले.
पुण्यातील 22 शाळांमध्ये जाऊन हे कार्य केले. याची पावती आम्हाला लगेचच मिळाली असून दर 15 दिवसांनी मुले आपापल्या शाळेत, वस्तीत आमची वाट पाहात आतूरतेने उभी असायची, ही आमच्या यशाची पहिली पायरी होती, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. या साऱ्या उपद्व्यापांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासही झाला. ती व्यक्त व्हायला लागली, हे यश समोर दिसत असतानाच करोना लॉकडाऊन झाले, पण हा उपक्रम सुरू तर ठेवायचा होताच.
मग आम्ही या उपक्रमाचं स्वरूप आम्हाला बदललं. आम्ही अस्मी गंमत कट्टा नावाने यू-ट्युब चॅनल सुरू केले. त्याचे 15 भाग झाले आहेत. मुलांना आवडेल अशी एक गोष्ट यात सांगितली जाते व ही गोष्ट फार मोठी नाही तर 5 मिनिटांची असते. त्यानंतर आम्ही त्यांना एक ऍक्टिव्हिटी देतो. गोष्टीत रमतच ही ऍक्टिव्हिटी लहान मुले मनमुरादपणे करतात, असं त्यांचे पालक सांगतात, असा आनंदही व्यवहारे यांनी व्यक्त केला.