नव्या सरकारबाबत शिक्षक आशादायी : स्वतंत्र बैठकीचे आश्वासन
जळोची – राज्याच्या विकासासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावणे गरजेचे आहे, शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली या वेळी झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्रमुख प्रातिनिधिक संघटना असल्याने मागील चाळीस वर्षांमध्ये शरद पवार यांनी शिक्षक संघामार्फत राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.
शिक्षकांचा सन्मान जपू – जयंत पाटील
प्राथमिक शिक्षक संघामार्फत राज्यातील शिक्षकांचे रखडलेले सर्व प्रश्न नव्या सरकारमार्फत सोडविण्यात येतील. शिक्षक संघाचा सन्मान पूर्वीप्रमाणेच जपला जाईल, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघासोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.
-बाळासाहेब थोरात, मंत्री, महाराष्ट्र राज्य