माळेगावात उभारण्यात येणार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. माळेगावात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि माळेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास 1 कोटी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आंदर मावळातील पश्‍चिम भागात टाकवेगाव सोडल्यानंतर कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध नाही, या ठिकाणी असणाऱ्या कुणे, अनसुटे, कुणेवाडी, माळेगाव बुद्रुक, पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव खुर्द, सावळा, आढारवाडी, गोंटेवाडी, ढोंगेवाडी, कळकराई या गावातील नागरिकांना उपचारासाठी 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील टाकवे, कान्हे वडगाव, तळेगाव या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. अनेकदा या परिसरातील नागरिकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे. आता माळेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे झाल्यानंतर या सर्व गावातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.

आंदर मावळातील नागरिकांची आरोग्य उपकेंद्राची मागणी सातत्याने होत होती. परिसरात आरोग्याची सेवा उपलब्ध नाही, नागरिकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने अन्य ठिकाणी उपचार घेणे त्यांना शक्‍य होत नव्हते; परंतु आता माळेगाव येथील आरोग्य उपकेंद्र झाल्यास अल्पदरात आरोग्याची सेवा मिळणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.