पुणे – समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षणासाठी 189 कोटी 77 लाख रुपयांचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली.
केंद्राचा 60 टक्के, तर राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा आहे. केंद्र शासनाने 121 कोटी 87 लाख 91 हजार रुपये राज्याच्या एकत्रित निधीत जमा केले. याच्या प्रमाणात राज्य हिस्स्याचा निधी हा 81 कोटी 25 लाख 27 हजार 333 रुपये एवढा आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. एकूण अर्थसंकल्पीय तरतूदीच्या 25 टक्के निधी वितरणास अनुमती मिळाली.
मोफत पाठ्यपुस्तकांसाठी 100 कोटी रुपये, आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी 25 कोटी रुपये, ग्रंथालय अनुदानासाठी 10 कोटी 50 हजार रुपये, शाळांना सानुग्रह अनुदानासाठी 25 कोटी रुपये, शैक्षणिक सहाय्यासाठी 21 कोटी 57 लाख रुपये, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी 2 कोटी 50 लाख रुपये, निवासी शाळा व वसगीगृहांसाठी 50 लाख रुपये याप्रमाणे निधीचे वितरण करण्याचे नियोजन आहे.