केदारनाथ – उत्तराखंडमध्ये सध्या भाजपच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोब्हेंबर रोजी केदारनाथचा दौर करणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून पुजाऱ्यांनीच विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उत्तराखंड सरकार अडचणीत सापडलं आहे.
येथील पुजारी लोक पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बुधवारी तातडीने पुजाऱ्यांना समजावण्यासाठी केदारनाथ येथे पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी पुजाऱ्यांसोबत बराच वेळ बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते.
याआधी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धनसिंग रावत यांच्यासह भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना केदारनाथमध्ये तीव्र विरोध झाला होता. पुजाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दर्शनही घेऊ दिले नव्हते.
दरम्यान, त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने जानेवारी 2020 मध्ये चार धाम देवस्थानम बोर्डाची स्थापना केली होती. यामुळे चार धामसह इतर 51 मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे गेले होते. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील चार धाम आहेत.
तेव्हापासूनच पुजारी आणि पांडा समाज सरकारकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. यातूनच आता पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला विरोध होत आहे.