मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने कोसळले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी आम्ही शिवसेनेत आहोत व सेनेतच राहू अशी भूमिका सातत्याने मांडली होती. तसेच शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत यावे अशी मागणीही त्यांनी पक्ष नेतृत्वापुढे ठेवली होती. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
जुनं ते सोनं म्हणतात ते यालाच…. pic.twitter.com/cV8ZeMIWjM
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2022
शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका होत आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातली एक व्हिडीओ क्लिप शेअर करत सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. दिवंगत मराठी अभिनेते सदाशिव अमरापूरकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.दुसऱ्या पात्रानं अमरापूरकरांनी बांधलेल्या एका मंदिराचा उल्लेख करून त्यांना सवाल केला आहे.
व्हिडिओमध्ये, हे पात्र म्हणत आहे की,“पुजारी अण्णा बाळाला केला, कारण आपल्याला देव व्हायचंय. यालाच राजकारण म्हणतात. आपलं आपणच पागोटं डोक्यावर ठेऊन घ्यायचं नसतं. दुसऱ्याला ठेवायला द्यायचं असतं. म्हणजे ठेवणाराही खूश आणि घालून घेणाराही खूष”, असं अमरापूरकर निभावत असलेलं पात्र या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.’ या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.