व्हॅटिकन सिटी : व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या निवासस्थानात वास्तव्यास असणारे एक पाद्री कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तेथे व्यापक चाचणी मोहीम राबवण्यात येत आहे. जीआनलुका पेझ्झोईल (वय 58) हे व्हॅटिकनच्या इटली विभागाचे प्रमुख आहेत. या आठवड्याच्या सुरवातीला त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे कायमचे निवासस्थान सांता मारता येथे आहे. त्यांना आता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोप फ्रान्सिस यांना थंडीताप आल्यानंतर त्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्याचा निकाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान मेस्सागेरो या रोमन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, व्हॅटिकनमधील अन्य एका अधिकाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. “होली सी’ने व्हॅटिकनला कोरोनाची बाधा झाली असल्याचे मान्य केले आहे. व्हॅटिकन संग्रहालय अीाण पपल स्टेट येथील कर्मचाऱ्याला बाधा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, पोप यांनी सामुहिक भोजनात भाग घेणे बंद केले असून ते एकटे जेवत आहेत. तसेच त्यांनी आपल्या भेटी मर्यादित केल्या आहेत, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र, व्हॅटिकनच्या वतीने अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.