सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात नॉनव्हेजचे जेवण देण्याची 121 वर्षांची परंपरा असणारे शहराच्या मध्यवस्तीतील एकमेव हॉटेल म्हणजे आवारे खानावळ! आज तिसरी पिढी ही खानावळ सांभाळत आहे. ज्याप्रमाणे पिढ्यान्पिढ्या परंपरेनुसार खानावळीचा हा व्यवसाय आवारे कुटुंबीय चालवत आहेत; त्याप्रमाणे पिढ्यान्पिढ्या या खानावळीचा आस्वाद घेणार अनेक पुणेकर आपल्याला भेटतात. 1901 मध्ये कुमठेकर मार्गावर आवारे हॉटेल ही खानवळ बाळोबा रघू आवारे यांनी सुरू केली.
बाळोबा यांचे चिरंजीव रामचंद्र आणि त्यांच्यानंतर नातू राजेंद्र आवारे अशी तिसरी पिढी हा व्यवसाय सध्या सांभाळत आहे. सचोटी आणि प्रामाणिकपणे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मांसाहाराचा आस्वाद देण्याचे जणू व्रतच आवारे कुटुंबीयांनी घेतले आहे. जेवणाबद्दल म्हणाल तर आवारेची चव आजसुद्धा जिभेवर रेंगाळते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक रांगा लावून याठिकाणी जेवण करतात, त्यावरूनच या हॉटेलच्या चवीची पावती मिळते.
सध्या खानावळीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रूपात दोन मजली बनविण्यात आलेल्या या खानावळीची चव मात्र बदललेली नाही. गेल्या पन्नास वर्षांपासून आवारे खानावळीतील रस्साची चव बदललेली नाही. तसेच मटण आणि चिकन याबद्दल बिनधास्त राहायचे; आवारेंच्या यशाचे हेच एकमेव रहस्य आहे.