गॅस सिलिंडर 19 रुपयांनी : शेंगदाणा तेल 20 रुपये, सोयाबीन तेल 8 रुपयांनी महाग
नागरिकांच्या खिशाला महागाईची बसतेय झळ
पिंपरी – दैनंदिन वापरातील खाद्य तेल, गॅस सिलिंडर तसेच इतर साहित्यांच्या किमतीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच शेंगदाणा तेलामध्ये प्रतिकिलो 20 रुपये तर सोयाबीन, सूर्याफूल आणि पामतेलाच्या दरही सहा ते आठ टक्क्यांनी महागले आहेत. या वस्तूंसोबतच घरगुती गॅस सिलिंडरही 19 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे नववर्षात नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
मागील वर्षातही सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात महागाईचे चटके सहन करावे लागले होते. आता नववर्षातही महगाईच्या या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टीचा फटका यावर्षातही बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील शेतमालाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे किराणा साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर यावर्षीच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील महागाईच्या सावटामुळे खाद्यतेल तसेच इतर वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. त्याचा परिणाम या नवीन वर्षातील पहिल्याच आठवड्यात पहायला मिळाला.
गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील नागरिकांना एका सिलिंडरसाठी 714.50 रुपये मोजावे लागत आहेत. मागील पाच महिन्यांचा विचार केला तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल 137.50 रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ होण्यापूर्वी घरगुती सिलिंडर (14 किलो) 695.50 रुपयांना मिळत होता.
त्याचबरोबर खाद्य तेलांच्या किमतीतही वाढ झाली. पूर्वी आयात शुल्क वाढल्यामुळे पामतेल तसेच सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. तर आता सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा भाव वाढ होत आहे. एरव्ही पामतेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमी असतात पामतेलावर पूर्वी आयात शुल्क 15 टक्के आकरण्यात येत होते. आता यामध्ये दुप्पट वाढ करून 30 टक्के आयात शुल्क करण्यात आले आहे. त्यामुळे पामतेलाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे, सध्या सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाचा दर प्रतिकिलो 97 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. खाद्य तेलाच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना यावर्षी महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्येही 70 रुपयांनी वाढ
घरगुती सिलिंडर सोबतच व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येही वाढ झाली आहे. मागील पाच महिन्यांच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडर 327 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे, सध्या व्यावसायिक सिलिंडर 1257.50 रुपयांनी मिळत आहे. या भाववाढीमुळे व्यावसायिकांच्याही अडचणींमध्ये वाढ झाली आहे.