पुणे : सिताफळाचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डात फळ विभागातील तुळजाराम पंथाराम बनवारी या गाळ्यावर पहिली आवक आज सोमवारी झाली. दर्जानुसार सिताफळाला घाऊक बाजारात किलोस 70 ते 201 रुपये भाव मिळाल्याची माहिती श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली. गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला किलोला सुमारे 140 रुपये भाव मिळाला. यावर्षी दीडपट अधिक भाव मिळाला असल्याचेही काची यांनी सांगितले.
वडकी येथील शेतकरी सागर दशरथ लडकत यांच्या शेतातून सुमारे 20 किलो सिताफळाची आवक झाली. डेक्कन येथील व्यापारी चेतन पायगुडे यांनी या मालाची खरेदी केली. चांगल्या प्रतीच्या मालास सर्वोच्च 201 रुपये भाव मिळाला. कोरोनामुळे सुमारे 50 दिवस फळविभाग बंद होता. मात्र, तो आठ दिवसांपूर्वी सुरू झाला. कोरोना धर्तीवर बाजार समितीने केलेल्या नियमाचे पालन करून व्यापार होत आहे. सिताफळाच्या आवकविषयी युवराज काची म्हणाले,
दरवर्षी जूनमध्ये हंगाम सुरू झाला असून, जानेवारीपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे. येथील बाजारात वडकी, फुरसंगी, पुरंदर तालुका, तळेगाव, राजगुरूनगर, खेड, मंचर, पाटस या भागांतून सिताफळाची आवक होत असते. हळूहळू आवकमध्ये वाढ होईल. मागील दोन-तीन वर्षांत सिताफळ उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, यावर्षी पाणी मुबलक उपलब्ध असल्याने सिताफळाचा हंगाम चांगला निघणार आहे. चांगल्या प्रतीचे पीक येण्याची अपेक्षा आहे.