पुणे – पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मार्केट यार्डातील फुल बाजारात दर्जेदार फुलांची आवक होत आहे. मात्र, गौराई पूजनानंतर सर्व प्रकारच्या फुलांना मागणी घटली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला आहे.
पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारात 200 ते 300 रुपये मिळणारे झेंडूला भाव 20 ते 60 रुपये किलोपर्यंत कमी झाले असल्याचे फुलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी सांगितले.
गणेशोत्सव, गौराई आगमनामुळे झेंडू, शेवंती, गुलछडी यांसह डच गुलाब, जर्बेरा आदी फुलांना मागणी वाढली होती. याकाळात पाऊस झाल्याने बहुतांश फुलांची प्रतवारी ढासळली होती.
मात्र, मागणी अधिक असल्याने झेंडूच्या फुलांना उच्चांकी भाव मिळाला. तर अन्य फुलांचे भावही तेजीत होते. आता मागणी घटल्याने झेंडूच्या भावात सर्वाधिक, तर अन्य फुलांच्या भावात 30 टक्क्यांनी घसरण झाली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : 20-60, गुलछडी : 100-250, अष्टर : जुडी 30-40, सुट्टा 150-300, कापरी : 40-100, शेवंती : 150-200, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 30-40, गुलछडी काडी : 20-40, डच गुलाब (20 नग) : 60-120, लिलि बंडल : 25-35, जर्बेरा : 10-20, जुई : 400-600.