भाजीपाल्याला फटका; खिशाला चटका

पुणे – नवरात्रोत्सव संपला, तरी अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्याचा विपरित परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. आवक रोडवल्यामुळे घाऊक बाजारातच सर्व भाज्यांचे दर काही प्रमाणात वधारले आहेत. त्यातून माल खराब येत असल्याने विक्रेते त्रस्त झाले आहेत.

यंदा प्रचंड पाऊस व पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यातील मुख्य पीक वाहून गेले किंवा खराब झाले. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी तेच पीक उशिराने घेतले. पण, अनेक भागांत अद्यापही पाऊस असल्याने त्याचा या पिकालाही फटका बसला आहे. आधीची अतिवृष्टी व आताच्या लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका फळभाज्यांना बसला आहे. विविध जिल्ह्यांमधून येणारा माल खराब येत आहे. याचा भाज्यांची आवक व किमतीवर परिणाम झाला आहे.

एखादा किरकोळ विक्रेता 100 किलो भाजी घाऊक बाजारातून विकत घेत असल्यास त्याला 20 ते 30 किलो भाजी फेकून द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

अजूनही मुसळधार पाऊस जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावत असल्याने, शेतकरीदेखील त्रस्त असून पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.