थेरेसा मे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव 

हुजूर पक्षामध्येच नेतृत्वबदलासाठी खासदारांचे गट सक्रिय 

लंडन – “ब्रेक्‍झिट’ची प्रक्रिया हाताळण्याच्या मुद्दयावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर आता राजीनामा देण्यासाठी दबाव यायला लागला आहे. “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयाला चिकटून राहिलेल्या थेरेसा मे यांना तिसऱ्या मतदानापूर्वी राजीनामा देण्याबाबत निर्वाणीचा इशारा देण्याचे काही खासदार आणि मंत्र्यांनी निश्‍चित केले आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या मतदानाच्यावेळी “ब्रेक्‍झिट’ला मुदतवाढ देण्याचा निर्णय होणार आहे. मात्र या मतदानापूर्वीच थेरेसा मे यांनी राजीनामा द्यावा आणि उपपंतप्रधान डेव्हिड लिडिंग्टन यांच्याकडे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सोपवावी यासाठी आता दबाव वाढतो आहे. मात्र खासदार आणि मंत्र्यांनी अशाप्रकारे दबाव तंत्र वापरण्याचे ठरवले असल्याचे अधिकृत सूत्रांनी फेटाळले आहे.

उपपंतप्रधान लिंडिंग्टन यांनी मात्र आपण 100 टक्के थेरेसा मे यांच्याच पाठिशी असल्याचे म्हटले आहे. केवळ पंतप्रधान बदलून ही समस्या सुटणार नाही. तर सत्तारुढ पक्षालाच बदलावे लागेल, असे युके चॅन्सेलर फिलीप हमोंद यांनी म्हटले आहे. थेरेसा मे यांच्या पाठीमागे सर्व खासदारांनी एकजूटीने उभे रहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून पुन्हा एकदा सार्वमत घेण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.