पुणे – शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणे आणि महापालिकेची मान्यता न घेता बोर्ड, फ्लेक्स लावणे चमकोगिरी करणाऱ्यांना महागात पडणार आहे. यापुढे महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास संबंधित जाहिरातदार व्यक्ती अथवा कंपनीकडून तसेच या दोघांनी दंड न भरल्यास संबधित जागा मालकाकडून सुमारे 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे.या बाबतचे आदेश आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त विजय लांडगे यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांच्या फ्लेक्सबाजीला ऊत आला आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय महापालिकेची मान्यता न घेता मोठे जाहिरात फलकही उभारण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्येही हे प्रमाण अधिक होते. त्यामुळे महापालिकेचा महसूलदेखील बुडाला आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा जाहीरातबाजांना आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली होती.
महापालिका आयुक्तांनी या दंडाच्या तरतूदीस मान्यता दिली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयानी त्याची तातडीनं अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तर अनधिकृत जाहिरात फलक शोधण्यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून निविदा मागवून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात
आलेल्या आहेत.
असे असेल दंडाचे स्वरुप
गल्ली-बोळांत आणि पदपथावर फ्लेक्स लावणाऱ्यांकडूनही यापुढे दंड वसूल केला जाणार असून 1 ते 10 पर्यंत बोर्ड लावणाऱ्यांकडून 1 हजार रुपये, तर त्यापेक्षा अधिक बोर्ड असल्यास जास्तीत जास्त 5 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तर या फलकांना महापालिकेची सशुल्क परवानगी घेता यावी, साठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ज्या जाहिरात फलकांचा दंड जाहिरातदार, जाहिरात कंपनी तसेच जागा मालक भरणार नाहीत त्यांच्या दंडाच्या रकमेची वसूली संबधित जागा मालकाच्या मिळकतकरातून वसूल केली जाणार आहे. परिणामी, आता अनधिकृत जाहिरातींना चाप बसण्यास मदत होणार आहे.