मस्कत –भारताच्या टी-20 व एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाबरोबरच कसोटी संघाचेही नेतृत्व सोडण्यासाठी विराट कोहलीवर प्रचंड दबाव होता, असा दावा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे.
त्याने यासाठी बीसीसीआयला जबाबदार धरले असून एका महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यावर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्वही काढून घेतले गेले. त्याचबरोबर कोहलीला कसोटी संघाचेही नेतृत्व सोडण्यासाठी दबाव होता. कोहलीने याच कारणाने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला, असेही अख्तर म्हणाला.
कोहलीने कर्णधारपद स्वतःहून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. तो सध्या कठीण काळातून जात आहे. पण, आता विराटला स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. तो एक चांगला व्यक्ती आणि खेळाडू आहे. त्याने जास्त काही न करता फक्त आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे. तो एक महान फलंदाज आहे. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतरांपेक्षा जास्तच यश कमावले आहे. आता फक्त त्याला आपला नैसर्गिक खेळ करायचा आहे, असेही तो म्हणाला.