अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या 69 बसेसवर दंडात्मक कारवाई
पुणे – दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असते. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारत प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. अशा अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या, धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांविरोधात परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यापैकी जादा भाडे आकारल्याबाबत 69 बसेसवर कारवाई केली.
दिवाळीच्या सुट्ट्यांत नागरिक पर्यटनासाठी किंवा बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरदार आपल्या मूळगावी जातात. त्यामुळे खासगी बसच्या प्रवाशांचे प्रमाणदेखील वाढते. प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा फायदा घेत खासगी बस वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडेदर आकारण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अवाजवी भाडे आकारणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले होते. त्यानुसार राज्यात 13 नोव्हेंबरपासून ही कारवाई करण्यात येत आहे.
राज्यभरात जादा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक, वाहन रचनेत बदल करणे आदींसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर कारवाई केली आहे. यांतर्गत सुमारे 2 हजार 195 बसेसची तपासणी केली असून, यात 375 दोषी आढळल्या. त्यामध्ये जादा भाडे आकारणाऱ्या 69 बसेस, लांबी वाढवून वाहतूक करणाऱ्या 13 बसेस, परवानगीपेक्षा जास्त सीट, स्लिपर वाढवलेल्या 5 बसेसचा समावेश आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. यातून प्रशासनाला 5 लाख 69 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.