सग्या सोयऱ्यांच्या अतिक्रमणावरील कारवाई रोखण्यासाठी
सांगवी – पिंपळे-गुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला सत्ताधारी नगरसेवकांकडून फोन करून कारवाई न करण्याबाबत धमकाविण्यात आले. त्यामुळे या पथकाला कारवाई न करताच परतावे लागले, ही नामुष्कीजनक गोष्ट आहे, असा गंभीर आरोप करत मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी “त्या’ नगरसेवकांचे पद रद्द करावे. अशी मागणी केली आहे. तसेच कारवाईत दुजाभाव करीत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे
केली आहे.
अतिक्रमणातील दुजाभाव उजेडात आणण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अरुण पवार यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, मंगळवारी अतिक्रमणविरोधी पथक सर्व लवाजम्यासह कारवाईसाठी पिंपळे गुरवमध्ये आले होते. मात्र, विद्यमान नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई टाळण्यासाठी धमकावले. त्यामुळे हे पथक कारवाईविनाच परतले. ही नामुष्कीजनक गोष्ट आहे. कायद्यात तरतूद असून, सेक्शन 44 अंतर्गत आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मुळात महापालिका प्रशासन स्वतंत्रपणे आपले कर्तव्य बजावत असते. मात्र, अलिकडे महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचताना दिसत आहे.
अधिकारी अतिक्रमण हटविण्याची कामे तटस्थपणे करीत नसल्याबाबत हेच नगरसेवक महापालिका सभागृहात आरडाओरडा करतात. आज पिंपळे गुरवमध्ये नदीपात्रालगत शंभरहून अधिक अनधिकृत पत्राशेड आहेत. मात्र, केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच अतिक्रमण विरोधी पथकाला फोन करून दबाव आणलेल्या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे.
पिंपळे गुरवमधील पत्राशेडवर कारवाई करा, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी काही नगरसेवक आयुक्तांसमोर ठाण मांडून बसले होते. त्यानुसार पथकाने शंभर पत्राशेडपैकी केवळ चार पत्राशेडवर कारवाई केली. व इतरांवर कारवाई न करताच हे पथक परतले. ठराविक अतिक्रमणे काढण्यासाठी नगरसेवक जोर लावतात आणि स्वतःच काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. यामुळे पथकाने शंभर पत्राशेडपैकी केवळ चार पत्राशेडवर कारवाई केल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.