राष्ट्रपतिपदक विजेते एसटीच्या प्रवासापासून वंचित

ई-तिकिटाच्या स्वयंचलित उपकरणात प्रवासाची सुविधा नाही

– प्रशांत घाडगे

पुणे – एसटी बसच्या ई-तिकिटाच्या स्वयंचलित उपकरणात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने अपंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राष्ट्रपतिपदक विजेते मोफत प्रवासापासून वंचित राहात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सुविधेसाठी राज्य शासन दरवर्षी राज्य परिवहन महामंडळाला (एस.टी) प्रतिव्यक्ती 11 हजार रुपये देते. तरीही राज्यभरातील राष्ट्रपतीपदक विजेत्यांना मोफत प्रवासापासून वंचित राहावे लागत आहे.

राष्ट्रपतिपदक विजेत्यांना एसटीने मोफत प्रवासाची सवलत मिळण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. अपंग व विशेष व्यक्तींसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल कालिदास सुपाते यांना 2012 साली राष्ट्रपतीपदक मिळाले आहे. दरम्यान, सुपाते एसटीने प्रवास करत असताना ई-चलन उपकरणात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. याबाबत, त्यांनी एसटी प्रशासनाकडे तक्रार केली असूनही अद्याप कार्यवाही झाली नाही. सुपाते यांना एसटी महामंडळाने प्रवासाचा पास दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवास करताना विजेत्यांना सवलत मिळत नाही.

मोफत प्रवास व इतर सुविधा कागदावरच
अपंग क्षेत्रात काम करताना मिळालेल्या राष्ट्रपतिपदक पुरस्कार विजेत्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आराम, निमआराम व साध्या एसटीमधून वर्षभर मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच, शासकीय विश्रामगृहात शासकीय दराने राहण्याची सोय करण्याची तरतूद अध्यादेशात केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अध्यादेशातील एकही सुविधा विजेत्यांना मिळत नाही.

“राष्ट्रपतीपदक पुरस्कार विजेत्यांच्या मोफत प्रवासाच्या संदर्भात माहिती घेतली जाईल. तसेच या व्यक्तींना एसटी प्रवासात सवलत देण्याविषयी मुख्य कार्यालयातून आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– यामिनी जोशी, वाहतूक नियंत्रक-पुणे विभाग


“गेल्या तीस वर्षांपासून विशेष विद्यार्थ्यांसाठी काम करत असल्याने राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. शासन निर्णयानुसार पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रोत्साहन मिळण्यासाठी मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते. मात्र, एसटी प्रशासनाच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत कोणताही लाभ मिळात नाही. याबाबत एसटी महामंडळाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पुरस्कार विजेते मोफत प्रवासापासून वंचित राहिले आहेत.
– कालिदास सुपाते, राष्ट्रपती पदक विजेते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.