राष्ट्रपती राजवट : बिग बींच्या ‘या’ प्रसिद्ध डायलॉगने राऊतांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई – राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून सुरु असलेला राजकिय पक्षांच्या संघर्षाचा प्रवास राष्ट्रपती राजवटीपर्यंत पोहोचला. सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक असलेल्या संख्याबळाची जमवाजमव करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. राज्यपालांच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर मंगळवारपासूनच (12 नोव्हेंबर) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राज्यपालांच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार स्थापनेसाठी आपल्याला तीन दिवसांचा अपेक्षित वेळ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवसेनेचे झुंजार नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अँजिओप्लास्टी करण्यात आली. प्रकृती बरी नसतानाही राऊत यांचे लिखाण सुरूच आहे. आजही संजय राऊत यांनी आज अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ट्विटरवर लिहला आहे. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांचा दावा करीत मुख्यमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावरून भाजपाने असा कोणताच शब्द शिवसेनेला दिलेला नसल्याचे सांगत शिवसेनेला खोटे ठरवले होते. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपात राजकिय दरी निर्माण होऊन सत्ता स्थापनेची चर्चा बंद केली होती. त्यानंतर राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाने बहुमताठी आवश्‍यक असणारे संख्याबळाचे गणित जमत नसल्याने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले. शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्याचे पत्र दिले नाही. इतक्‍या आमदारांचे पाठिंब्याच्या सहीचे पत्र देण्यासाठी तीन दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळून लावत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला आमंत्रित केले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही असमर्थता दर्शविली. त्यामुळे केंद्रिय मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशींच्या फाईलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवटीनंतरही राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.