Donald Trump Oath Speech: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील प्रमुख नेते, उद्योगपती उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी उद्घाटन भाषण देखील केले. या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अमेरिका कसा असेल, त्यांचे परराष्ट्र धोरण कसे असेल, अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.
आजपासून अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू होत असे म्हणत, त्यांनी त्यांच्या भाषणात चीनला देखील लक्ष्य केले. अमेरिकेत कोणालाही घुसखोरी करू देणार नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. तसेच, राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्याच दिवशी 100 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
उद्घाटन भाषणात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर उद्घाटन भाषणात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आजपासून अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. आपला देश आता समृद्ध आणि सन्मानित होईल. नेहमीच अमेरिकेला प्राधान्य देईन, हे मी स्पष्ट करतो.
चीन-पनामा कालव्यावर केले भाष्य
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात चीन आणि पनामा कालव्यावर भाष्य केले. चीन हा कालवा चालवत असून, ही एक मूर्खपणे दिलेली भेट असल्याचे ते भाषणात म्हणाले. ‘पनामा कालवा चीनला भेट म्हणून दिला. हा मूर्खपणा आपण केला आहे. तेव्हापासूनच चीनकडून याचा वापर केला जात आहे. आम्ही पनामा कालव्याचा ताबा परत घेणार आहोत.’
अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी
बेकायदेशीररित्या अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याला ट्रम्प यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. आता त्यांनी भाषणामध्ये अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी लागू करणार असल्याचे म्हटले आहे. बेकायदेशीर प्रवेश थांबवून स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. तसेच, गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
यासोबतच, ट्रम्प यांनी अमेरिकन अंतराळवीरांना मंगळ ग्रहावर पाठवणार असल्याचीही घोषणा केली. अमेरिका संपत्ती वाढवेल, प्रदेशाचा विस्तार करेल आणि मंगळावर देखील आपला झेंडा फडकवेल, असे ते भाषणात म्हणाले.