मुंबई – राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. यावेळी ते हेलिकॉप्टरने रायगडावर जाणार होते. मात्र, रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. यानंतर राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे. ते आता हेलिकाॅप्टर ऐवजी रोप-वेने रायगडावर जाणार आहेत. यासंदर्भात भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 3 ते 7 डिसेंबर कालावधीत रायगड किल्ला आणि रोपवे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
”छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.”, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, सुरेक्षेसाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणूनच पोलिसांनी आधीच सूचना दिली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना काही दिवसापूर्वी रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते.