नवी दिल्ली – देशभरात आज भाऊ-बहिणींच्या रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी आणि रेशीम धागा बांधत असून संरक्षणाचे वचन घेत आहे. दुसरीकडे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही परिचारिकांच्या बरोबर (नर्सिंग प्रोफेशन) राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रपतींनी करोना संकटात परिचारिकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रपती भवना कडून प्रसिध्द झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिचारिकांनी राष्ट्रपतींना राखी बांधली आणि करोना संकटात केलेल्या कामाचा आपला अनुभव त्यांना सांगितला. परिचारिकांचा सन्मान करताना राष्ट्रपती म्हणाले की, तुम्ही करोना संकटात आघाडीवर काम करत आहात आणि कामाच्या प्रति तुमची बांधिलकी पाहता तुमच्याबदल आणखीनच आदर वाढला आहे.
President Kovind celebrated Raksha Bandhan with nurses of The Trained Nurses’ Association of India, Military Nursing Service and President’s Estate Clinic. The President appreciated the role of nurses as saviours in the fight against COVID-19. pic.twitter.com/PM94nmu6VN
— President of India (@rashtrapatibhvn) August 3, 2020
राष्ट्रपती यावेळी म्हणाले की, रक्षाबंधन हा सण पारंपरिकरित्या बहिण-भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतिक आहे आणि भावाने बहिणीचे रक्षण करावे, तिला जपावे या भावनेतून भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो, पण सध्या करोनाचे संकट पाहता आता तुमची भूमिका बदलली आहे. तुम्ही भावांकडून रक्षण मागत नाही तर नागरिकच त्याच्या रक्षणाकरिता तुमच्याकडे मदतीसाठी हात पुढे करत आहेत आणि तुम्ही त्यांना ती भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहात.
यावेळी त्यांनी आर्मी परिचारिका (नर्सिंग) सेवेतील दोन सदस्यांचा संदर्भ दिला, ज्यांना रूग्णांची सेवा करतांना करोना विषाणूची लागण झाली, पण बरे झाल्यानंतर त्या त्वरित उत्साहाने कामावर परत आल्या. करोना महामारीच्या संकटात देशातील परिचारिकांनी केलेल्या कार्याचा सन्मान करत त्यांनी त्यांचे आभार मानले आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी प्रत्येक परिचारिकांनी करोना रूग्णांवर उपचार करतानाचा अनुभव देखील यावेळी सांगितला. यावेळी प्रत्येकाचे अनुभवात एक साम्य होते ते म्हणजे, या आजाराबद्दल झालेल्या चुकीच्या समजुतीमुळे अनेक रूग्ण मानसिक तणावाखाली होते आणि याचे निराकारण हे समुपदेशनव्दारे केले जावे असे त्यांनी सांगितले.