राम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान सुरू

राष्ट्रपती रामनाथ कोविंदसह योगी आदित्यनाथ, मोरारीबापू आणि शिवसेनेने दिली देणगी

नवी दिल्ली – अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी निधी समर्पण अभियानाची सुरवात आजपासून झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतः पाच लाख 100 रुपयांची देणगी देऊन या अभियानाची सुरवात केली. त्यांच्याकडे देणगी मागण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ गेले होते. त्यामध्ये ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आलोककुमार यांचा समावेश होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यासाठी 11 लाख रुपयांची, शिवसेनेने एक कोटी रुपये आणि मोरारीबापू यांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

या अभियानाचा प्रारंभ काशीविश्वनाथाच्या मंदिरातूनही झाली. या निधी संकलन अभियानची पहिली पावती श्री विश्वेश्वराला अर्पण केली आणि काशीमध्ये अभियानाची सुरवात करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विश्व हिंदू परिषदेचे विनायकराव देशमुख यांच्याकडे एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश प्रदान केला.

या अभियानाची आज देशभर सुरवात झाली. अभियानात देशभरातील पाच लाखांपेक्षा जास्त गावांपर्यंत पोचून सुमारे 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हे अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन अतिशय बारकाईने नियोजन केले आहे. मोठी शहरे व गावांमधील प्रत्येक वस्तीतील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी वस्तीपातळीपर्यंत समित्या व कार्यकर्त्यांची रचना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.