“इकोग्राम’च्या प्रणेत्या

हायटेक टेक्‍सटाईल पार्कच्या अध्यक्षा, सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शहरात पर्यावरण चळवळ राबविताना ग्रामीण भागातील लोकांना सहभागी करून एक विधायक उपक्रम राबविला आहे. गावकुसातील लोकांना विकासाच्या प्रवाहात सामील करून त्यांच्यातील विधायक ऊर्जेला चालना दिली. आणि पाहता पाहता लोकसहभागातील पर्यावरण, सामाजिक चळवळ व्यापकरित्या गतीमान झाली. या कार्याला जोड देणाऱ्या आणि ग्रामीण भागाचा कायापालट करणाऱ्या सुनेत्रावहिनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीला दिलेला उजाळा.

काटेवाडीच्या वहिनी… काटेवाडी म्हंटले की, डोळ्यासमोर छबी येते. ती म्हणजे आदरणीय पवार साहेबांची, येथेच त्यांनी बालपणीचे धडे गिरवले. दादांचे म्हणजेच अजित पवार यांचेही बालपण काटेवाडी गेले. जेथे ते शिस्तप्रिय बनले व राज्याला कणखर नेतृत्त्वाचा आदर्श घालून दिला. पण, खरी ओळख काटेवाडीची देशाला झाली ती म्हणजे स्वच्छतेच्या प्रणेत्या सुनेत्रा वहिनी यांच्यामुळेच. वहिनींनी स्वतः हातात खराटा घेऊन गावाला आवाहन केले आणि त्यानंतर त्यांनी उभारलेली चळवळ गावाचा कायापालट करून गेली. हागणदारीमुक्‍त, छप्परमुक्‍त, सिमेंट रस्ते, सौर ऊर्जा दीपपथ, वनराईने नटलेले काटेवाडी हे देशातील पहिले इकोग्राम बनले, ते वहिनींमुळेच. आज, साहेब, दादा, ताई आणि माझ्यासारखे काटेवाडीकर सुद्धा गर्वाने सांगतात.

की, एकदा काटेवाडीला भेट द्या. याचे श्रेय फक्‍त सुनेत्रा वहिनींनाच जाते. काटेवाडी गावचे आणि ग्रामस्थांचे भविष्य कायम उज्ज्वल व्हावे, चमकत राहावे; याकरिता गेली कित्येक वर्षे आदरणीय सुनेत्रावहिनी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून काटेवाडीचे नाव आज देशभरात गाजत आहे. वहिनींच्या मार्गदर्शनाखाली काटेवाडीतील नवी पिढी आता गावाला आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यातूनच गावाच्या विकासाला गती मिळाली असून काटेवाडीचे नाव विविध क्षेत्रात चमकत आहे. काटेवाडी गावात होत गेलेल्या आमुलाग्र बदलांचा मी स्वतः साक्षीदार आहे. आदरणीय वहिनींच्या कष्टामुळे काटेवाडीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

त्यामुळेच शासन दरबारीही अनेक कामे सहज मार्गी लागतात, याचा मला अनुभव आहे. घरामध्ये कोणी आजारी पडले, कोणी रडले की कुणाला काही लागले तर कोणीतरी आपुलकीने बोलणारे असते, तीच भूमिका काटेवाडीकरिता वहिनी म्हणून पार पडत आहेत. निरागस आणि तितक्‍याच सहनशील, सौम्य, प्रेमळ, कर्तृत्ववान आणि तितक्‍याच कठोर असलेल्या वहिनींच्या पाठबळामुळेच काटेवाडीचा पूर्ण कायापालट होऊ शकला. आमच्या काटेवाडीकरिता वहिनी या एक अनमोल देणे आहेत. आज, वहिनी ज्या पदांवर कार्यरत आहेत, तेथे त्या यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळत आहेत. सुनेत्रावहिनींकडून गावगाड्यांतील लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. याची प्रचिती बारामती तालुक्‍यातील प्रत्येक गावांमध्ये येत आहे.

पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न असो, त्या सोडविल्या जात आहेत. त्यांच्या कामांत गावांचे अर्थकारण गतीमान व्हावे, हा हेतू असतो. शेतीशी निगडित असलेल्या या घटकांना उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. गावगाडा सुरळीत हाकला तर अर्थचक्राला चालना मिळते, हा हेतू त्यांनी साध्य केला आहे. “केल्याने होत आहे रे’, याची प्रचिती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी वहिनींची धडपड आणि लोकसहभाग साधण्यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहेत. जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी अविरतपणे कार्य सुरू केले आहे. लोकांमध्ये जलसाक्षरतेची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याला विधायक आणि व्यापक स्वरूप आले आहे.

या विकासकामांतून ओढा, नाले खोलीकरणासाठी त्या सढळ हाताने मदत करतात. जलसंधारणाच्या कामातून गावागावांत शिवारे हिरवाईने नटली आहेत. बारामती तालुक्‍यातील जिरायती भागात शेतीमध्ये जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्या जलदूत म्हणून काम करीत आहेत. हे काम राज्यात रोल मॉडेल म्हणून नावारूपास आले आहे. हायटेक टेक्‍सटाईलच्या पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी यांनी महिलांना रोजगारवाटा निर्माण करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला या “चूल आणि मूल’ या चौकटीत अडकून संसाराचा गाडा हाकत असतात. त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे. बारामती शहरात हायटेक टेक्‍सटाईल पार्कमध्ये हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

यातून महिला स्वावलंबी बनल्या आहेत. तसेच एक महिला संपूर्ण कुटुंब साक्षर करते. त्याचप्रमाणे या महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. टेक्‍सटाईलमुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे. बारामती, दौंड, इंदापूर, फलटण (सातारा) तालुक्‍यांतून महिला नोकरीसाठी येतात. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांचे कुटुंब सक्षम झाले आहे. तसेच महिलांच्या प्रश्‍नांकडे त्या कटाक्षाने लक्ष देत आहेत. ग्रामीण भागातील तरूणांसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी निभावली आहे.

माहिती, तंत्रज्ञानाच्या युगातील उद्योन्मुख तरूणांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. वहिनींचे काम आम्ही कधी विसरू शकत नाही. पढील पिढीलाही आम्ही ते विसरू देणार नाही. भविष्यात तुम्ही राज्यातील महिलांचे नेतृत्त्व करावे, अशी आमची अपेक्षा व्यक्‍त करून, वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

– शब्दांकन : गोकुळ टांकसाळे, (भवानीनगर)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.