नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आफ्रिकेतल्या या तीन देशांना भारताच्या राष्ट्रपतींनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० परिषदेमध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर वर्षभराने राष्ट्रपती मुर्मू या दौऱ्यावर गेल्या आहेत.
आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती द्विपक्षीय बैठका घेतील आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील. तीन देशाच्या दौऱ्या सर्वप्रथम राष्ट्रपती अल्जेरियाला जाणार आहेत. अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमादजीद तेब्बौने यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान अल्जेरियाला भेट देणार आहेत. अल्जेरियातील तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पीपल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमजीद तेब्बौने आणि इतर प्रमुख नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
याशिवाय राष्ट्रपती अल्जेरियातील महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देतील. यामध्ये माकम इचाहिद या शहीद स्मारकावर त्या पुष्पहार अर्पण करणार आहेत. राष्ट्रपती रोमन अवशेष, समाधी आणि हम्मा गार्डनलाही भेट देतील. भारत-अल्जेरिया इकॉनॉमिक फोरमलाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 तारखेला मॉरिटानियाला भेट देतील आणि दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात १७ ते १९ तारखेला मलावीला भेट देतील.
या देशांच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू या देशांमधील प्रमुख नेत्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. तसेच प्रमुख व्यापार आणि उद्योग नेत्यांशी आणि भारतीय समुदायाशी देखील त्या संवाद साधणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटी दरम्यान या देशांबरोबर भारताचे ४ सामंजस्य करार देखील होणार आहेत. भारत आणि आफ्रिकेतल्या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न राष्ट्रपतींच्या या दौऱ्यादरम्यान केला जाणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (आर्थिक संबंध), डम्मू रवी यांनी सांगितले आहे.
आफ्रिकन युनियनला जी-20 सदस्यत्व मिळाल्याचे महत्व…
भारताच्या नेतृत्वाखालील जी-20 परिषदेत आफ्रिकन युनियनला कायम सदस्य करून घेण्यात आल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आफ्रिकेत 54 देशांचा समावेश आहे आणि ते ग्लोबल साउथचा गाभा आहे, असे रवी म्हणाले.