नवी दिल्ली: कारगील विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी रुग्णालयाला 20 लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोविड-19 च्या उपचारांसाठीची उपकरणे खरेदी करण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. या निधीतून “पॉवर्ड एअर प्युरिफाईंग रेस्पिरेटर’या युनिटची खरेदी केली जाणार आहे.
याद्वारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ऑपरेशनच्यावेळी श्वसनास अडथळे येणे बंद होणार आहे, तसेच संसर्गाचा धोकाही संभवणार नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. रुग्णसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या सोयीसाठी ही मोलाची मदत असणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या खर्चात कपात केल्यामुळे लष्कराच्या रुग्णालयासाठी राष्ट्रपतींचे योगदान शक्य झाले आहे, अशी माहिती या निवेदनामध्ये देण्यात आली आहे.
करोनाचे संकट उद्भवल्यानंतर राष्ट्रपतींनी यापूर्वी अनेक उपाययोजना सुरू करून राष्ट्रपती भवनाचा खर्च कमी करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी त्यांनी औपचारिक प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या लिमोझिन कार खरेदीचा प्रस्ताव देखील पुढे ढकलला होता. लष्करी रुग्णालयाला देणगी दिल्यामुळे राष्ट्रपतींनी देशाच्या सशस्त्र दलांचे मनोबल उंचावण्यास मदतच केली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.