नगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर कही ठिकानी पेरण्यांना वेग आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या असून, काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मान्सून दाखल होताच वार्षिक सरासरीच्या 24.92 टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मृग नक्षत्राच्या पेरण्यांना वेग आला आहे. नगर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर याकाळात सरासरी 516 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही जून महिन्याच्या 15 दिवसात जिल्ह्यात सरासरी 22 मिलिमीटर म्हणजेच जवळपास 24 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 26 मिलिमीटर म्हणजे अवघ्या 5 टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मुग, सोयाबीन, बाजरी, मक्याची पेरणीला वेग आला आहे. बि-बीयाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये अकोले तालुक्यात-155 मिलिमीटर, संगमनेर- 148 मिलिमीटर, कोपरगाव- 179 मिलिमीटर, श्रीरामपूर-246 मिलिमीटर, राहुरी-181 मिलिमीटर, नेवासा- 135 मिलिमीटर, राहाता- 95 मिलिमीटर, नगर- 100 मिलिमीटर, शेवगाव- 98 मिलिमीटर, पाथर्डी- 41 मिलिमीटर, पारनेर- 155 मिलीमीटर, कर्जत- 110 मिलिमीटर, श्रीगोंदा- 87 मिलिमीटर व जामखेड तालुक्यात- 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शहरासह परिसरात शनिवारी काही मध्यम, हलक्या प्रमाणात, तर रविवारी रात्री काही भागात सलग दुसऱ्यादिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नगर शहर व उपनगर परिसरात रस्ते जलमय झाले होते.
जिल्ह्यात नेवासा, राहुरी, राहाता, पारनेर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी यातालुक्यात काही भागता चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या वतीने पुणे, नाशिक, बरोबरच नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.