पुणे – लॉकडाऊन असतानाही कोणतेही अत्यावश्यक काम नसताना काही नागरिक जुने प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे दुकानात औषधाच्या नावाखाली कॉस्मेटिक वस्तू आणण्यासाठी गर्दी होते.
लॉकडाऊन काळात ग्राहकांना औषध दुकानात कॉस्मेटिक्सच्या वस्तू उपलब्ध होणार नाहीत. तसेच विक्रेत्यांनीही ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी त्या वस्तूंची विक्री करू नये, अशा सूचना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे (सीएपीडी) सचिव अनिल बेलकर यांनी केमिस्टांना दिल्या आहेत.
अनेकदा बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठीही नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यावर किंवा औषध दुकानात गर्दी होते. हा मागील लॉकडाऊनमधील अनुभव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
…तर घरपोच औषध
नागरिकांना लॉकडाऊन काळात औषधे उपलब्ध होण्यासाठी त्यांनी त्यांच्या केमिस्टच्या व्हॉट्स ऍप क्रमांकावर प्रिस्क्रिप्शन पाठविल्यास त्यावरून तुम्हाला घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. केवळ औषधांसाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि गर्दी करू नये, असेही आवाहन संघटनेने केले आहे.