पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’ पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा आता दि.24 सप्टेंबरनंतर घेण्यात येणार असून, त्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) स्पष्ट केले आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) परीक्षा आणि “नेट’ परीक्षा एकाच वेळी येत असल्याने यूजीसी “नेट’ लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा 16 सप्टेंबर पासून सुरू होणार होती.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा घेतली जाते. आयसीएआर परीक्षांचे आयोजन दि.16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. त्यामुळे यूजीसी-नेट परीक्षा आता 24 सप्टेंबरनंतरच होतील, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक साधना पराशर यांनी दिली.
काही विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली, असेही त्या म्हणाल्या.