कोची – भारतीय नौदलातील पायलट म्हणून तीन महिलंची पहिली तुकडी आपली जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाली आहे. नौदलातील डोर्नियर विमानांवर या पायलट महिलांची तुकडी तैनात केली जाणार आहे. लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शुभांगी स्वरूप आणि लेफ्टनंट शिवांगी या तिघीजणी सागरी मोहिमेसाठी तयार असल्याचे संरक्षण प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले. या पायलट आता नौदलाच्या दक्षिण विभागात डोर्नियर विमानावर मोहिमेवर जाण्यास तयार आहेत, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
27 व्या डोर्नियर डॉर्नियर ऑपरेशनल फ्लायिंग ट्रेनिंग कोर्समध्ये 6 वैमानिक सहभागी झाले होते. हे सर्व वैमानिक गुरुवारी “आयएनएस-गरुडा’वर झालेल्या “ऑपरेशनल मरीटाईम रेकोनाइसान्स पायलट’ म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करून पासिंग आऊट समारंभात सहभागी झाले होते. त्यामधील तिघा पायलट महिलांचा नौदलाच्या तुकडीमध्ये समावेश आहे. या पासिंग आऊट समारंभामध्ये नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रशिक्षण विषयाचे चीफ स्टाफ ऑफिसर रिअर ऍडमिरल ऍन्टनी जॉर्ज हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व पायलटना पारितोषिकांनी गौरवण्यात आले.
लेफ्टनंट दिव्या शर्मा या नवी दिल्लीतील मालवीय नगरमधील, लेफ्टनंट शुभांगी स्वरूप या उत्तर प्रदेशातील तिहारमधील आणि लेफ्टनंट शिवांगी बिहारच्या मुझफ्फरपूर येथील आहेत. त्यांनी हवाई दलात प्रथमिक प्रशिक्षण घेतले आणि नंतर नौदलातील डोर्नियर विमान उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
–