नाशिक – राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला देदीप्यमान यश मिळाले आहे. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातील राजकारणात त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे, भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मविश्वास या विजयानंतर वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विविध जिल्ह्यात दौरे सुरू असून भाजप पदाधिकाऱ्यांनी ते संवाद साधत आहेत.
नाशिक जिल्ह्यात महायुतीच्या 14 पैकी 14 जागांवर उमेदवार विजयी झाल्यामुळे येथील उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी ते आज नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी, आत्ताच त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना 2029 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश दिले. बावनकुळे यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या काही जागा कमी मतांनी पडल्या, त्या जिंकल्या असत्या तर आपले 143 आमदार असले असते, असेही त्यांनी म्हटले.
बावनकुळे म्हणाले, लोकसभेत आपण थोड्या कमी मताने मागे राहिलो. विरोधकांनी केलेला खोटारडापणा होता, त्यामुळे आपला पराभव झाला. कांदा आणि आदिवासी प्रश्न, संविधान बदल ह्या खोटारडेपणाचा विरोधकांनी बाऊ केला, विरोधकांच्या खोट्या गोष्टीमुळे आपण कमी पडलो. मोदीजी आणि आपण विकसित भारत यावर बोलत गेलो आणि खोट्या गोष्टींमुळे मागे पडले. उशिरा पण आपला खरा विजय झाला. विधानसभेला आपण 149 जागा लढलो आणि 132 जागांवर जिंकलो, असे बावनकुळे यांनी म्हटले.
लाडक्या बहिणीकडून विरोधकांना मोठा धक्का दिला. नाना पटोले मशीनवर हरले बॅलेट पेपरवर जिंकले, त्यांनी मुख्यमंत्री होणार म्हणून कोट पण शिवला होता, असा टोलाही त्यांनी लगावला. करंजेकर आपला कार्यकर्ता उभा होता म्हणून नाना पटोले जिंकले, नाहीतर अकरा हजार मतांनी पटोले पडले असते. रोहित पवार पण बॅलेट पेपरमुळे जिंकले, आपण काही ठिकाणी कमी मताने हरलो नाहीतर आपले 143 आमदार असते, हा मोठा महाविजय असता, असेही बावनकुळे यांनी म्हटले.