मतमोजणी केंद्राबाहेरील सुरक्षेची व्युहरचना तयार

पुणे – लोकसभा मतमोजणी दरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून दक्षता घेण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येणार नाहीत, अशी व्युहरचना करण्यात आली आहे. हा प्रयोग कराड येथे विधानसभा निवडणूक मतमोजनीवेळी राबवण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 23 मे रोजी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते केंद्राबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मतमोजणीतील चढ-उतार लक्षात घेऊन घोषणाबाजी, एकमेकांना डिवचणे आदी प्रकारांतून अनेकदा राडाही होतो. यातूनच गंभीर स्वरुपाचा गुन्हाही घडण्याची दाट शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून वेगळ्या पद्धतीचा प्रयोग राबविण्यात येत आहे.

मतमोजणी केंद्राबाहेर परस्परविरोधी प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्रीत येऊ न देता, त्यांना थांबण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे हे चिपळूण व कराड येथे पोलीस उपअधिक्षकपदी कार्यरत असताना त्यांनी चिपळून नगरपालिका व त्यानंतर कराड विधानसभा निवडणुकीसाठी असा प्रयोग राबविला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडली नाही. चिपळूण, कराडमध्ये राबविलेला हा वेगळा प्रयोग लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यानही राबविण्यात येणार आहे. याला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

“लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रकार घडू नयेत, यासाठी आम्ही चिपळून व कराड येथे राबवलेला प्रयोग येथे राबवणार आहोत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. तसेच, निवडणुकीप्रमाणेच मतमोजणीही शांततेत पार पडेल.’
– मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.