नवी दिल्ली – ऊर्जा मंत्रालयाने देशातील वीज ग्राहकांच्या हक्कांची नियमावली तयार केली आहे. त्याद्वारे प्रथमच वीज ग्राहकांना त्यांचा हक्क मिळणार आहे.
ही नियमावली लोकांच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात आली आहे. त्यावरील आक्षेप आणि सूचनांचा विचार करून अंतिम नियमावली निश्चित केली जाणार आहे. नागरिकांनी 30 सप्टेंबरपर्यंत आपली सूचना आणि आक्षेप कळावावेत, असे आवाहन ऊर्जा मंत्रालयाकडून करण्यात आले आहेत.
वीज ग्राहकांचे समाधान होणे महत्त्वाचे असून त्यासाठी त्यांना काही महत्त्वाचे अधिकार दिले जाणार आहेत. नवीन वीज कनेक्शनसाठीही मुदत निश्चित करण्यात आली असून या मुदतीत नवीन कनेक्शन मिळवणे हा ग्राहकांचा अधिकार असणार आहे.
त्यानुसार महानगरांच्या हद्दीत सात दिवसांत, नगरपालिकांच्या हद्दीत पंधरा दिवसांत आणि ग्रामीण भागात 30 दिवसांत नवीन वीज कनेक्शन देण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारींसाठी 24 तास खुले असणारे टोल फ्री कॉल सेंटरही उभारले जाणार आहे.