श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारणी सुरू
पुणे – नऱ्हे परिसरातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा देऊन सर्वच स्तरातील रुग्णांना बरे केले जात आहेत. या हॉस्पिटलमध्ये आता “कोविड-19′ अर्थात करोनाशी लढण्यासदेखील सुसज्जित यंत्रणा उभारण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. भविष्यात जर गंभीर परिस्थिती उद्भवली तर आपणही तयार असले पाहिजे, या उद्देशाने या हॉस्पिटलमध्ये तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती एसकेएन महाविद्यालय व हॉस्पिटलच्या प्रिन्सिपल डॉ. शालिनी सरदेसाई यांनी दिली.
डॉ. सरदेसाई म्हणाल्या, सध्या या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. शिवाय करोनाशी लढण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता जोमाने करण्यात येत आहे. मास्क आणि सॅनिटायझर तयार ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस तसेच कर्मचारी आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
वेतनाची समस्या लवकरच सुटणार
गेल्या काही वर्षांपासून काही घडामोडींमुळे एसकेएन कॉलेज आणि हॉस्पिटलला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. राज्य समाजकल्याण विभागाकडे 19 कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याने तसेच महाविद्यालयाला येणारे शुल्क वेळेत न मिळाल्याने काही समस्या उद्भवल्या होत्या. मात्र, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकच सर्वांचे थकीत वेतन अदा करण्यात येईल, अशी माहिती डॉ. सरदेसाई यांनी दिली.