पुणे – सीबीएसई, आयसीएसईसह अन्य केंद्रीय मंडळाचे विद्यार्थी आणि राज्य शिक्षण मंडळाची दहावी परीक्षा 2021 पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी उद्यापासून (दि.28) अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व माहिती प्राप्त करूनच सीईटीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर अर्ज करताना 178 रुपये, बॅंकिंग चार्जेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस असे शुल्क भरावे लागेल. यासाठी पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी अर्ज करताना प्रथम ई-मेल आयडी तयार करावा लागेल. त्यावर मोबाइल क्रमांक आणि परीक्षेचे माध्यम नोंदवणे आवश्यक आहे. सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे या विषयासाठी विद्यार्थ्यांस अन्य एक माध्यम निश्चित करावे लागेल.
या विद्यार्थ्यांनी फोटो आयडी, पासपोर्ट साईज फोटो, नमुना स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून संगणक प्रणालित अपलोड करावी लागणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तात्पुरत्या अथवा कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा, तालुका, शहराला विभाग (वार्ड) निश्चित करावा लागेल.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्जात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा आणि त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे प्रणालीत अपलोड करावी लागतील. याबाबतची सर्व माहिती तयार ठेवूनच अकरावी सीईटीची कार्यवाही करावी, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
तांत्रिक संदर्भात टोल फ्री
अकरावी सीईटीसंदर्भात शंकाचे निरसन करण्यासाठी यापूर्वीच हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची माहिती बोर्डाच्या संकेतस्थळावर आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सीईटी प्रक्रियेच्या तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 98230-09841 या टोल फ्री क्रमांकवर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत संपर्क साधावा, असेही राज्य शिक्षण मंडळाने म्हटले आहे.