* 144 ठिकाणी बाथरूमची सोय
* शहरात 18 ठिकाणी 300 तात्पुरती शौचालये
* एकूण 678 शौचालये
* 140 मुतारी 20 पाणी टॅंकर
एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड
आळंदी : कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीला वेग आला आहे. गुरुवारी (दि. 17) ते बुधवारी (दि. 23) कालावधीत आळंदीतील उत्सव सोहळा पार पडणार आहे. रविवारी (दि. 20) कार्तिकी एकादशी तर मंगळवार (दि. 22) संजीवन समाधी सोहळा आहे.
यंदा 5 लाखांपेक्षा अधिक भाविक यात्रेला येण्याची शक्यता आहे. पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु आहे. दरम्यान, सोहळा सुरू होण्यापूर्वीच रविवारी (दि. 13) इंद्रायणीतीरी स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 8 सहायक पोलीस आयुक्त, 50 पोलीस निरीक्षक, 193 उपनिरीक्षक, 1250 अंमलदार, 250 वाहतूक अंमलदार, 650 होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या 3 कंपन्या, एनडीआरएफच्या 2 तुकड्या, बीडीडीएसचे 2 पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात 235 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउसिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सूचना मिळणार आहे. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत. 6 हॉकर्स स्कॉड तैनात असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे. करोनानंतर हा सोहळा निर्बंधमुक्त होणार असल्यामुळे भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, काही अडचण अथवा समस्या आल्यास नजीकच्या पोलीस मदत केंद्र किंवा 112 क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
– सुनील गोडसे, वरिष्ठ पालीस निरीक्षक, आळंदी
पास व्यवस्था
भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात असून भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करावा लागणार आहे. दि. 19, 20, 21, 22 तारखेला शहरात रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे त्यामुळे स्थानिक व भाविकांनी आपली वाहने 19 तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी लावावीत आणि ती पुन्हा बाहेर काढू नये असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. दरम्यान, यात्राकाळात गुरुवार (दि. 17) ते बुधवार (दि.23) दरम्यान, भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद-मरकळ-आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
24 तास वीज,पाणी, आरोग्यसुविधा
भाविकांच्या स्वागतासाठी आळंदी नगरपरिषद सज्ज झाली आहे. यात्राकाळात 24 तास आरोग्यसुविधा, पाणी, वीज देण्यात येणार आहे. इंद्रायणीचे पाणी दूषित असल्यामुळे भामा आसखेड धरणातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. महिला-पुरुष भाविकांना स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे.आवश्यक ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे.
दुकाने गजबजली
शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात जंतुनाशक धूर फवारणी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीचे कामही पूर्णत्वास येत आहे. टाळ, पखवाज, फूल-प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हॉटेल्स उभारणी सुरु आहे.