वाहन कंपन्यांची उत्पादन वाढविण्यासाठी लगबग
नवी दिल्ली – एप्रिल, मे, जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात वाहन विक्री वाढली आहे. त्यामुळे आशावादी झालेल्या कंपन्या उत्सवावर डोळा ठेवून उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दसऱ्यासह अनेक सण येतात. त्या काळात भारतात खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर संसर्ग होऊ नये, यासाठी स्वतःचे वाहन असावे असे अनेक ग्राहकांना वाटते. ही बाब ध्यानात घेऊन मारुती सुझुकी कंपनी ऑगस्ट महिन्यात 1 लाख 18 हजार तर सप्टेंबर महिन्यात दीड लाख वाहनांची निर्मिती करण्याची शक्यता आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
हिरो मोटोकॉर्प हे दुचाकी क्षेत्रातील कंपनी ऑगस्ट महिन्यात 5 लाख 75 हजार वाहनांची निर्मिती करणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात ही संख्या सव्वासहा लाखांपर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे. जुलै महिन्यात या कंपनीने 5 लाख 30 हजार वाहनांची निर्मिती केली.
उत्पादन वाढणार असल्याचे या कंपन्यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले नसले तरी मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना उत्पादनात वाढ करावी लागणार असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहन कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झालेला आहे. 1 एप्रिलपासून बीएस- 6 उत्सर्जन मानदंड लागू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला.
सुट्या भागाची तयारी
लॉकडाऊनमधील झीज भरून काढण्यासाठी वाहन कंपन्या आगामी काळात विक्री वाढविण्यासाठी उत्पादन वाढवतील याचा अंदाज सुटे भाग निर्मात्या कंपन्यांना आला आहे. त्यामुळे सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन आगोदरच वाढविले असून कमीत कमी दोन महिने पुरेल एवढे उत्पादन तयार ठेवले असल्याचे सांगितले जाते.